दिसणारा हर एक जण परका वाटला होता
ओळखी पुसायचा मी घाट घातला होता
कधी होणार समतल ही जातींची उतरंड
तसा शबरीच्या बोराने रामही बाटला होता
कळा त्या सोसतानाही कुणाला बोललो नाही
उपाशी मी जरी होतो अधाशी वागलो नाही
नशीबा भोग सारे तू दिलेले भोगतो आहे
तरीही मी कधी दुखी कुणाला वाटलो नाही
सुखाच्या कल्पना माझ्या जराश्या वेगळ्या होत्या
सुखी होतो असा मी की सुखाला पेललो नाही
कसोटी लागली तेव्हा निघालो मी खरे नाणे
तरीही मीच बाजारी कुठेही चाललो नाही
असा मी तीर होतो की चुकीने मारला गेलो
जिथे मी पाहिजे होतो तिथे मी लागलो नाही
देवीदास हरिश्चन्द्र पाटील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा