बुधवार, ७ मे, २००८

गावची एष्टी

धाच्या सुमारास एष्टी धामणगावच्या स्टॅंडवर पोचली...नागपूरहून झाकटीतच निघलो व्हूतो. ते कसं असतूया, पायटी-पायटीत निघालं मन्जी सगये टायमिंग् बरुबर टायमाले भेटते. तसंही मले नेहमीचचं टेंशन रायते गावाच्या एष्टी टायमींगचं... माह्य टायमींग कधी एष्टीच्या टायमींग बरुबर जुयलंच नायी.
मले भ्या नेयमीच राह्ये फाट्याचा... परतेक गावाले फाटा रायते तसाच माह्या गावाले पण हूता (हूता? माह्य गाव थोडं सुधारलं, आता तीथं फाटा रायला नाह्यी)... लईच म्हण्जी दोन एक कोस अंतर... पाचच्या नंतर अंधार पाडल्यावर पायी जायचं मण्जे लई वाखे होत.
आपली गोष्ट मातुर भलतीकडेच चाल्ली ना! माह्या आजून एक प्रॉब्लेम हुता... एष्टी कंची अन कोन्त्या फलाटावर लागते त्येचा कायीच पत्ता लागत नायी अन एष्टीले बोर्ड त नसतेच. डेपोत जाव ईचार्याले थ थतीसा कोनाचाच पत्ता नायी...मंग समोरच्या हॉटेलात गेलो अन पयलेत कॉफीची ओर्डर दिली, हळूच हॉटेलवाल्याले ईचारलं,
"कहो, भौ ह्ये वाठोड्याले जाणारी एष्टी कवा येते"....
"सडेधा ले थे थती त्या कोपर्‍यात "...
म्या ईचारलं,"काऊन स्टॅंडवर उभी रह्यत नाह्यी ?"...हॉटेलवाल्यानं मले एकदा वरुन खाल्ती पायलं अन फक्तं हसला. मंग म्या थतीच थोडी पेटपूजा केली अन एष्टीची वाट पाहु लागलो... थोडं इकडे तिकडे टाईमपास करुनशान आलो परत अन हॉटेलवाल्याले ईचारलं, 'अजून कशी काय एष्टी लागली नायी?''...
"अहो, भौ साडे धाचा टाइम थ गेला, तुमी कूठीसा गेले व्हुता"...
मी एकदम चॅट पडलो "मी अथीच थ व्हुतो, मले त कोंत्याच एष्टीले पाटी दिसली नाह्यी"...
"भौ कोंत्या एष्टीले पाटी असते?"...
"मंग वयखायची कशी?"...
" अशीच, सारेच वयखते... तुमी नवीन हयेत ना पाव्हणं म्हनून इचका झाला".
आता गावाले कसं जायचं लई पंचाईत... अन थे ही सान्ज्याले? तेवढ्यात थो हॉटेलवाला बोल्ला,"थ्या पलीकडे सायकलचं दुकान हाये, तेथूनशान सायकाल घ्या अन लवकर नीघा...". म्या ईचार केला (कधी कधी ईचार करतू म्हन्तो) की या लोकाईले कसं काय ओयखता येते आपल्या गावाची एष्टी... मंग मले येते माह्या ईन्जीनीयर व्हायची लाज...
आता सायकलनंच जायचं व्हतं म्हनून थोडं खाऊन घेतलं, जसं कोन्या युध्दावर निघालो... तसं आठ कोस सायकलनं जायचं म्हन्जी युध्दाचंच परसंग. जेवन खावन झालं... थोडं मुताले गेलो तवापर्यन्त अडीच वाजले व्हते... मुतून आलो थ हॉटेलवाला वाटच पाहून रायला हुता...
"गड्या! अजून एक टाईम लागला हाय, ह्ये ड्रायवर अन कंडॅक्टर तुह्यीच पाहून रायले" ...थे दोघेही मले पाहुन शान हसले...मले थ एकदम देवच भेटले व्हते.
"भौ, काह्यी घाई नाह्यी तूमाले घेतल्याबीगर एष्टी जागची हलनार नाह्यी"... मंग माह्यी वरात निघाली ड्रायवर अन कंडॅक्टर सोबत... हॉटेलवाल्याले थॅंक्यू म्हनायच राहुन गेलं...
गाडीत बसलो... कंडॅक्टरनं तिकीट फाडलं... पण मले रहवलं नाह्यी..
म्या त्याले ईचारलं," कंडॅक्टरभौ, एष्टीले गावाची पाटी काऊन लावत नाह्यी !"...
"इचार करु...पूढच्या एष्टी महामंडळाच्या बैठकीत नक्की प्रस्ताव मांडू .. पण लावून फायदा काय, अथीसा कोन वाचते, कोनाले वाचाले येते" अन तेवढ्यात ड्रायवरनं गेयर टाकला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: